"लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा" का म्हणत असतील असे सगळे? आणि मोठे झाल्यावरच का बर वाटत असेल सगळ्यांना अस? लहान मुले, देवा घरची फुले असही म्हणतात बरेच. म्हणजे नक्कीच ह्या लहान पणात काहीतरी छान गोष्टी घडत असणार ज्या मोठ्या झाल्यावर नाही करता येत.
मुळात सुरवातच रडण्या पासून होते. आपण रडत असतो आणि बाकी सगळे खुश होऊन हसून मिठाई वाटत असतात. कोणाला म्हणून पडलेली नसते आपल्या रडण्याची. आपली आई आणि नर्स दोघींचेच म्हणाल तर लक्ष असते आपल्याकडे. मग सुरवात होते आपल्या आयुष्याला. मग सगळयांचे तर्क वितर्क सुरू होतात. आई सारखा दिसतो आहे का? नाही नाही बाबांसारखा चेहरा आहे. कोणी म्हणेल पन्जोबा पुन्हा आले जन्माला तर कोणी म्हणणार खूप रडत आहे द्वाड म्हातारा आहे की काय कोणी जुना? स्वतहाची वेगळी अशी ओळखच ठेवत नाहीत. मग सुरू होते घरात बोबडे बोलणे. अरे अरे सगळे बोबडे बोलतात जशी शर्यत लागलेली असते. मग प्रत्येकाचा अट्टहास सुरू होतो. आई बोल बाळा, बोल बा......बा.... असे करता करता आपण मोठे होत असतो. लहानपणी कपडे घालायची बाकी मस्तच ऐश असते. पाहिजे तेवढ्या वेळा खराब करा म्हणजे पाहिजे तेवढ्या वेळा आई बदलणार. कोणी पाहुणे पाहायला आले की खाऊ आणि कपडे तर असणारच. खाऊ खायला दात नसतात मग फक्त कपडे घालायचे आणि खाऊ कडे पाहून लाळ गाळायची. आपल्या नावाखाली सगळे मस्त खाऊ चा फडशा पाडत असतात. राग येत असतो पण पर्याय नसतो.
आपण मोठे होऊ लागतो. रांगायच सोडून आपण आता उभे राहू लागतो. मग गाणी सुरू होतात. बाळ उभा राहिला कोणी नाही पाहिला. अस म्हणून म्हणून सगळ्यांना दाखवत असते आणि बघा ना बघा ना कसा उभा राहतो आहे ते. तिची पण काय चुक पुत्रप्रेम ना. काहीही केल तरी तिला नवलच. मग आपण हळू हळू पावले टाकायला सुरवात करतो. आई चे लक्ष असते तेंव्हापासून आतापर्यंत की कुठे पाऊल चुकीचे तर नाही पडत ना. मग सुरू होते आपले जीवन, स्वतहाचे जीवन, आपले बालपण..
बालपण.. म्हणाल तर मज्जा, म्हणाल तर सजा.. आता वाटते बालपणाचा काळ सुखाचा, तेंव्हा वाटायचे कधी मोठे होणार? आता सारखे शाळेचे टेन्षन अजिबात नव्हते तेंव्हा. ना आम्हाला ना आमच्या आई बाबांना. आता मुलांना कमी आई बाबांना च जास्त टेन्षन असते. आईने त्या वेळी जितका अभ्यास केला नसेल तितका आज ती बाळाला शिकवायला करते.
मग आपण शाळेत जायला सुरवात होते. मग पुन्हा "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" ह्या म्हणीला खर करण्याच्या प्रयत्नात बरेच जण मोठा झाल्यावर डॉक्टर होणार, इंजिनियर होणार आणि बरच काही म्हणत असतात आणि आपले करीयर लहानपणीच नक्की करत असतात. आपण लक्ष देत नाही कारण आपल्याला खेळायची पडलेली असते आणि कळत पण नसते काही. सकाळी उठल्यावर खेळायला जाणे, शाळेच्या वेळात घरी येणे, शाळेतून आले की पुन्हा कार्यक्रम सुरू. एक कळत नाही एवढी ताकद यायची कुठून? काहीही काम सांगा पळत जायच आणि पळत यायच. आता सांगा पाळायला. त्यातल्या त्यात तुमचे बालपण जर गावाला गेले असेल आमच्या सारखे तर मग विचारूच नका. एकदम आझाद पन्छि, कसलीच फिकीर नाही, कसलीच पर्वा नाही. कुठे लागेल का, पडलो तर काय होईल, काही काही नाही. गावाला आमचा आवडता खेळ म्हणजे "गोट्या". मला अजूनही आठवते आहे माझ्याकडे जवळपास ५०० च्या वरती गोट्या होत्या साचवलेल्या. तहान भूक हरपून जायचे सगळे खेळायला लागलो की. चोर पोलिस ही आमचा आवडता खेळ. आणि प्रत्येकाला पोलिस व्हायलाच आवडायचे. पोलिसाचे कपडे विकत आणण्यासाठी नेहमी आई बाबांकडे सगळ्यांचा हट्ट.
खेळता खेळता दिवस जाऊ लागतात आणि आपण मोठे मोठे होऊ लागतो. तेंव्हा कल्पना नसते आपल्याला की आपण आयुष्याच्या कुठल्या वाटेवर जात आहोत. आई बाबांनी पाहिलेल्या, तुम्ही स्वतहाने पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करता करता बालपण कधी सरुन जाते कळतच नाही.
आता तुमच्याकडे वेळ आहे खेळांसाठी? खेळांसाठी जाऊद्यात, स्वताहासाठी आहे? ते निष्पाप, निरागस बालपण पुन्हा यावे असे सगळ्यांनाच वाटते. मलाही वाटते. आठवड्यातील एक दिवस लहान मुलाप्रमाने वागा, बागडा, आनंद लूटा बघा तुमचे आयुष्य नक्कीच वाढेल.
mast ...........
ReplyDelete