Friday, July 2, 2010

बालपण..

"लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा" का म्हणत असतील असे सगळे? आणि मोठे झाल्यावरच का बर वाटत असेल सगळ्यांना अस? लहान मुले, देवा घरची फुले असही म्हणतात बरेच. म्हणजे नक्कीच ह्या लहान पणात काहीतरी छान गोष्टी घडत असणार ज्या मोठ्या झाल्यावर नाही करता येत.

मुळात सुरवातच रडण्या पासून होते. आपण रडत असतो आणि बाकी सगळे खुश होऊन हसून मिठाई वाटत असतात. कोणाला म्हणून पडलेली नसते आपल्या रडण्याची. आपली आई आणि नर्स दोघींचेच म्हणाल तर लक्ष असते आपल्याकडे. मग सुरवात होते आपल्या आयुष्याला. मग सगळयांचे तर्क वितर्क सुरू होतात. आई सारखा दिसतो आहे का? नाही नाही बाबांसारखा चेहरा आहे. कोणी म्हणेल पन्जोबा पुन्हा आले जन्माला तर कोणी म्हणणार खूप रडत आहे द्वाड म्हातारा आहे की काय कोणी जुना? स्वतहाची वेगळी अशी ओळखच ठेवत नाहीत. मग सुरू होते घरात बोबडे बोलणे. अरे अरे सगळे बोबडे बोलतात जशी शर्यत लागलेली असते. मग प्रत्येकाचा अट्टहास सुरू होतो. आई बोल बाळा, बोल बा......बा.... असे करता करता आपण मोठे होत असतो. लहानपणी कपडे घालायची बाकी मस्तच ऐश असते. पाहिजे तेवढ्या वेळा खराब करा म्हणजे पाहिजे तेवढ्या वेळा आई बदलणार. कोणी पाहुणे पाहायला आले की खाऊ आणि कपडे तर असणारच. खाऊ खायला दात नसतात मग फक्त कपडे घालायचे आणि खाऊ कडे पाहून लाळ गाळायची. आपल्या नावाखाली सगळे मस्त खाऊ चा फडशा पाडत असतात. राग येत असतो पण पर्याय नसतो.

आपण मोठे होऊ लागतो. रांगायच सोडून आपण आता उभे राहू लागतो. मग गाणी सुरू होतात. बाळ उभा राहिला कोणी नाही पाहिला. अस म्हणून म्हणून सगळ्यांना दाखवत असते आणि बघा ना बघा ना कसा उभा राहतो आहे ते. तिची पण काय चुक पुत्रप्रेम ना. काहीही केल तरी तिला नवलच. मग आपण हळू हळू पावले टाकायला सुरवात करतो. आई चे लक्ष असते तेंव्हापासून आतापर्यंत की कुठे पाऊल चुकीचे तर नाही पडत ना. मग सुरू होते आपले जीवन, स्वतहाचे जीवन, आपले बालपण..

बालपण.. म्हणाल तर मज्जा, म्हणाल तर सजा.. आता वाटते बालपणाचा काळ सुखाचा, तेंव्हा वाटायचे कधी मोठे होणार? आता सारखे शाळेचे टेन्षन अजिबात नव्हते तेंव्हा. ना आम्हाला ना आमच्या आई बाबांना. आता मुलांना कमी आई बाबांना च जास्त टेन्षन असते. आईने त्या वेळी जितका अभ्यास केला नसेल तितका आज ती बाळाला शिकवायला करते.

मग आपण शाळेत जायला सुरवात होते. मग पुन्हा "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" ह्या म्हणीला खर करण्याच्या प्रयत्नात बरेच जण मोठा झाल्यावर डॉक्टर होणार, इंजिनियर होणार आणि बरच काही म्हणत असतात आणि आपले करीयर लहानपणीच नक्की करत असतात. आपण लक्ष देत नाही कारण आपल्याला खेळायची पडलेली असते आणि कळत पण नसते काही. सकाळी उठल्यावर खेळायला जाणे, शाळेच्या वेळात घरी येणे, शाळेतून आले की पुन्हा कार्यक्रम सुरू. एक कळत नाही एवढी ताकद यायची कुठून? काहीही काम सांगा पळत जायच आणि पळत यायच. आता सांगा पाळायला. त्यातल्या त्यात तुमचे बालपण जर गावाला गेले असेल आमच्या सारखे तर मग विचारूच नका. एकदम आझाद पन्छि, कसलीच फिकीर नाही, कसलीच पर्वा नाही. कुठे लागेल का, पडलो तर काय होईल, काही काही नाही. गावाला आमचा आवडता खेळ म्हणजे "गोट्या". मला अजूनही आठवते आहे माझ्याकडे जवळपास ५०० च्या वरती गोट्या होत्या साचवलेल्या. तहान भूक हरपून जायचे सगळे खेळायला लागलो की. चोर पोलिस ही आमचा आवडता खेळ. आणि प्रत्येकाला पोलिस व्हायलाच आवडायचे. पोलिसाचे कपडे विकत आणण्यासाठी नेहमी आई बाबांकडे सगळ्यांचा हट्ट.

खेळता खेळता दिवस जाऊ लागतात आणि आपण मोठे मोठे होऊ लागतो. तेंव्हा कल्पना नसते आपल्याला की आपण आयुष्याच्या कुठल्या वाटेवर जात आहोत. आई बाबांनी पाहिलेल्या, तुम्ही स्वतहाने पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करता करता बालपण कधी सरुन जाते कळतच नाही.

आता तुमच्याकडे वेळ आहे खेळांसाठी? खेळांसाठी जाऊद्यात, स्वताहासाठी आहे? ते निष्पाप, निरागस बालपण पुन्हा यावे असे सगळ्यांनाच वाटते. मलाही वाटते. आठवड्यातील एक दिवस लहान मुलाप्रमाने वागा, बागडा, आनंद लूटा बघा तुमचे आयुष्य नक्कीच वाढेल.




Wednesday, June 30, 2010

खडतर प्रवास..

आमच्या आजी आजोबांना ५ अपत्ये. पाचही मुले. आजी आजोबांची परिस्थिती बेताचिच. आज्जीने तर रस्त्या वर खडी फोडायला जाऊन घराकडे लक्ष दिले. आजोबा मशीन काम करायचे. एकदम देव माणूस कधी कोणाला वरच्या आवाजात बोलले नाहीत. आज्जी थोडी कडक पण तो कडक पनाच संस्कार म्हणून आज आमच्या अंगात भिनतो आहे. मोठे काका शिकले आणि लहान भावंडांना शिकवले. २ काका जास्त शिकू नाही शकल्याने शेती करतात. आमच्या बाबांचा नंबर लागतो चौथा. बाबा हुशार होते लहान पणापासूनच. मॅट्रिक ला चांगले गुण मिळाल्याने डिप्लोमा ला प्रवेश मिळाला. थोडे दिवस गेल्यानंतर पैश्यांची अडचण होऊ लागली. डिप्लोमा अर्धवट सोडून पुन्हा गावी यावे लागले. पुढील शिक्षणाचा प्रश्न सतवु लागला. गावी राहूनच पुढील शिक्षण घेण्याचे ठरले. जुन्नर ला थोडे आणि थोडे पुण्याला असे करून बी.ए. पर्यंतचे शिक्षण कसे बसे झाले. नशीबाची साथ म्हणा किंवा देवाची कृपा म्हणा गावात माध्यमिक शाळा सुरू झाली होती. गावातील होतकरू तरुण म्हणून बाबांना शाळेत नोकरी लागली. १९६५ सालची गोष्ट. पगार अंदाजे १०० रुपयांच्या आसपास होता. एकत्र कुटुंब होते त्यामुळे घराकडे बघण्याची जबाबदारी पण येऊन पडली होती. १९७२ साली लग्न झाले. आई च्या रूपाने घरात लक्ष्मी आली होती. हळू हळू दिवस सुधारत होते. १९७३ ला मुलगी झाली. माझी मोठी ताई. आम्ही सगळे माई बोलतो कारण आई ने जी माया लावली तीच माया आणि संस्कार तिने आम्हा लहान भावंडांवर केले आहेत. १९७५ साली मुलगा म्हणजे माझा मोठा दादा आणि १९७९ साली मुलगी म्हणजे माझी छोटी ताई झाली. बाबांनी पुढचे शिक्षण घेण्याचे ठरविले. नोकरी सोडून शिक्षण घेणे शक्य नव्हते त्यामुळे बाहेरूनच शिक्षण घ्यावे लागले. बाबा बी. एड. झाले. १९८१ साली माझा जन्म झाला आणि बाबा शाळेचे मुख्याध्यापक झाले. गावातील घर छोटे होते त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला एकत्र राहणे अवघड झाले होते. १९८७-८८ साली कुटुंबाचे वाटप करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. आता आई बाबा आणि आम्ही चौघे असे ६ जन वेगळे राहू लागलो कारण पुर्वी राहत असलेल्या घरात काका आजी आजोबांना घेऊन राहत होते. बाबांचे मुख्य लक्ष आता आम्ही चौघे आणि आमचे शिक्षण होते. माई ला दहावीला ७३ टक्के गुण मिळाले. बारावी सायन्स साठी जुन्नर ला प्रवेश घेण्यात आला. अकरावी ला तिने गावा हून येऊन जाऊन केले. बारावीला हे सगळे शक्य नव्हते. म्हणून आम्ही १ वर्ष जुन्नर ला जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. तो बाबांचा निर्णय अगदी योग्य ठरला आणि माई ला बारावीला चांगले गुण मिळाले. माई ला मेडिकल ला पुण्याला प्रवेश मिळाला. आम्ही सगळे एकदम आनंदी होतो पण बाबांना वेगळेच टेन्षन होते. ते कधीही बोलून दाखवत नसत. त्यावेळी माई ला ११ हजार फी होती. पुण्यात राहण्याचा खर्च वेगळा. एवढे सगळे पैसे आणायचे कुठून एकदम, राहण्याची सोय कशी होणार असे अनेक प्रश्न बाबांसमोर पडले होते. बाबांनी कर्ज घेण्याचे ठरवले. त्यांच्यासाठी आमचे शिक्षण म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. १ वर्ष जाते ना जाते तोच दादाचा डिप्लोमा प्रवेश येऊन ठेपला. दादाला मुंबई ला केमिकल इंजिनियरिंग च्या डिप्लोमा साठी प्रवेश मिळाला. ६००० रुपये फी होती एका वर्षाची. माई च्या शिक्षणा साठी कर्ज आधीच काढले होते. आता पुन्हा दादा ला कसे शिकवायचे असा मोठा प्रश्न बाबांसमोर येऊन पडला. राहण्याची सोय घरातील सगळ्यात मोठा चुलत भाऊ ह्याच्याकडे झाली. त्याचे उपकार मानावे तेवढे थोडेच. बाबांनी आता त्यांच्या प्रॉविडेंट फंड मधील पैस्यानवर कर्ज काढण्याचे ठरवले. दोघांचे शिक्षण सुरू झाले. दोघेही आपआपल्या क्षेत्रात चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होत होते. दोघांनाही आपले वडील कसे आपले शिक्षण पूर्ण करत आहेत ह्याची पूर्ण जाणीव होती. आता नंबर होता तो आम्हा लहान भावंडानचा. ताई ला दहावीला ८८ टक्के मिळाले आणि आमच्या सगळ्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही. बाबांनी तिला ही डिप्लोमा ला प्रवेश घेण्याचे ठरविले. पुण्याला सरकारी कॉलेज मधे तिला प्रवेश मिळाला. आता पुन्हा प्रश्न राहण्याचा आला. तिलाही माई ज्या वसती गृहात रहात होती तिथे प्रवेश मिळाला. आता तिघांच्या शिक्षणाचा खर्च एकदम येऊन पडला होता. कर्जाचे हप्ते भरावे लागत होते. ऐशो आरामाचे जीवन काय असते कधीच पाहिले नव्हते. पोटाला चिमटा काढत सगळयांचे शिक्षण चालू होते. दादाचा डिप्लोमा पूर्ण झाला आणि त्याला सुरवात म्हणून एक कमी पगाराची नोकरी मिळाली. तो त्याचा राहण्याचा आणि स्वतहाचा खर्च पाहु लागला. बाबांचे थोडे टेन्षन कमी झाले होते. तरीही दोघींचा पुण्याला राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्च डोईजडच होता. ताई ला डिप्लोमा ला चांगले गुण मिळाले आणि तिचा डिग्री चा प्रवेश निश्चित झाला. पण त्यासाठी तिला यवतमाळ ला जावे लागले. आई बाबांनी शिक्षणा साठी स्वतहाच्या मनावर दगड ठेवून मुलीला एवढ्या लांब पाठविले. आता शिक्षणाचा आमचा क्रमांक होता. माझ्या आयुष्यात तोपर्यंत बर्‍याच अशा गोष्टी होऊन गेल्या होत्या ज्या नको घडायला पाहिजेत होत्या. मला दहावी आणि बारावी ला कमी गुण मिळाले होते त्यामुळे बाबांना बराच मनस्ताप झाला होता माझ्यामुळे. शेवटी मला पण डिप्लोमला प्रवेश घेण्यात आला. माई चे शिक्षण पूर्ण झाले होते तोपर्यंत. मग माई, दादा आणि मी एका लहानश्या घरात राहू लागलो. माई तिथेच प्रॅक्टीस म्हणून एका हॉस्पिटल मधे जाऊ लागली. २००० रुपयांमधे आम्ही घरभाडे, लाइट बिल, जेवणाचा खर्च, प्रवासाचा खर्च सगळे पाहु लागलो. कधी म्हणून १ रुपया विनाकारण खर्च नाही केला कोणी. माझ्यात एवढी जिद्द कुठून आली कोण जाणे आणि मी एकदम जोमाने अभ्यास करू लागलो. डिप्लोमा ला मी पूर्ण कॉलेज मधे प्रथम आलो. माझ्या आई बाबांच्या डोळ्यातून नकळत पाणी आले. आनंदाश्रू होते ते. मला डिग्री ला प्रवेश मिळाला. बाबांचा लोड बर्‍यापैकी कमी झाला होता तोपर्यंत. मधल्या काळात दोघी बहिनींचे लग्न झाले. माझे शिक्षण पूर्ण झाले आणि बाबा निवृत्त झाले.
आज आम्ही चौघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहोत. माई आणि मोठे दाजी ह्यांचे मोठे हॉस्पिटल आहे. दादाचे स्वतहाचे मुंबई ला घर असून त्याचा व्यवसाय चांगला चालला आहे. वाहिनी पण चांगला जॉब करते. लहान ताई आणि
दाजी पण चांगल्या नोकरीत आहेत. माझेही लग्न झाले असून कामानिमित्त अमेरिकेला आहे आणि बाबांसाठी एक सुशिक्षित आणि सोज्वळ सूनबाई पण आहे :)
बाबांना सगळे मिळून पाच नातवंडे आहेत. त्यांच्या सोबत खेळण्यात बाबांचा वेळ चांगला निघून जातो.
बाबांच्या ह्या खडतर प्रवासात आई ची साथ मोलाची होती. त्या वेळेस गेलेल्या त्या टेन्षन मधील दिवसांची भर आता दोघेही काढत आहेत. एक मात्र नक्की आम्हाला सगळ्यांना पाहून त्यांना नक्कीच सुखाची आणि समाधानाची झोप येत असेल.
बाबा तुम्ही आमच्यासाठी सर्वस्व आहात. वी ऑल लव यु सो मच..
.
- संतोष पवार